मी आणि माझी राज्यसेवा ..
–
राज्यसेवा पहिल्यांदा नापास झालो तेव्हा खूप रडायला आलेलं , खूप अभ्यास केलेला. त्यावेळी पूर्ण वेळ अभ्यासाठी दिलेला
तरी म्हणावा तसा निकाल लागला नाही त्यामुळे जास्त रडायला आलेलं ..
दुसरया वेळी नापास झालो तेव्हा सुद्या पहिल्या पेक्षा जास्त जोषात अभ्यास केलेला . यावेळी सुद्धा पूर्ण वेळ अभ्यासासाठी तरी सुद्धा निकाल आलाच नाही ; पण या वेळी स्वतःला समजून सांगितलं होतं की आपण कुठेतरी कमी पडत आहोत त्यावर काम करायला पाहिजे .. जे पास होतात ते काय करत असतील नेमकं ?? यावर काम केलं . योग्य ते मार्गदर्शन घेऊनच तिसऱ्या वेळी मार्गक्रमन केलं होतं आणि हा तिसरा प्रयत्न सुद्धा फेल ठरला .. .
–
प्रामाणिक प्रयत्नांना न्याय मिळाला नाही की थोडस वाईट वाटतच .
या वेळी वाईट वाटलं पण या वेळी मी रडलो नाही किंवा खूप दुःख झालं असं झालं नाही ,
याचा अर्थ इतकाच की मी या वेळी ‘स्वतःला स्वीकारलं’ .
नाही होत अपल्याच्याने बस झालं आता ..
काही वेळा आपण घेतलेला निर्णय चुकीचा असतो हे आपल्याला कळत असत ‘ पण आपण वळूनच घेत नाही ते फक्त आपल्या हट्टापायी किंवा मी करूनच दाखवतो
हा इगो मध्ये येतो ..
या मध्ये वेळ जातो , वय जात , काही तरी करून दाखणव्याची जी उमेद असते त्यातील उत्साह निघून जातो . कारण आपण ते अपयश स्वीकारतो कमी आणि मनाला जास्त लावून घेतो आणि मग आपण घेतलेल्या कष्टाला आपणच चुकीच्या नजरेने बघायला लागतो #mpsc किती वाईट आहे !! कुणी नादाला लागू नका!! असे नकळत विचार बनायला लागतात, पण तसं नसतंच कधी …
योग्य वेळी योग्य निर्णय घेतला पाहिजे आणि या वेळी मी राज्यसेवा सोडन्याचा निर्णय घेतला.
माझ्याकडू आणि घरच्यांकडून तस या निर्णयाच स्वागत आहे वडील म्हणाले बघ अजून एकदा विचार कर नंतर ठीक आहे तुला जस वाटत तो निर्णय घे ..
उगाच प्रेरणादायी व्हिडिओस बघून उसनं आवसान आणायचं परत स्वतःची समजूत काढायची हे मला नाही जमनार या वेळी सांगितलं मी तस स्पष्ट.
मी स्वतःच्या क्षमतेवर या वेळी जोर दिलाय आणि मला हे पटतंय आता ;
‘नाही होत तर नकोच …’
.
स्वतःला स्वीकारल आणि बाहेर पडलो मित्र चिडवतात “अधिकारी” म्हणून . पावणे मंडळी तर डिवचण्यासाठीच असतात पण मुद्दा तो नाही-
जो पर्यंत मी स्वतःला स्वीकारणार नाही तो पर्यंत मी माझा होणार नाही. नाहीतर मी अपयशी झालो ही भावना आतमध्ये जाळ धरेल आणि त्यामध्ये समाजाच्या भीतीने आणि कोण काय म्हणेल या भावनेत मीच मला आतमध्ये जाळून टाकीन ..
त्यापेक्षा सोप्प आहे व्यक्तिगत आयुष्यातील यश अपयश स्वीकारा आणि पुढील वाटचाल योग्य दिशेने करा .. मित्र पाहूने भावकी सगळे हा समाजाचाच भाग आहे आणि मी समाजात राहतो: त्यामुळे त्यांच बोलणं मनाला लावून घेण्यासाठी नसतंच कधी .. ही माणसं दोन डोंती असतात यश मिळालं तर भागीदार होतात आणि अपयश आल तर आपण कसे गुन्हेगार आहोत हे ते पटवून देतात;
मग आपण घेतलेला निर्णय किती चुकीचा होता त्याच स्पष्टीकरण आपण न विचारता आपल्याला मिळत !!
“मी सांगितलं होतं ते नको करू अस कर तस कर”
हीच ती दोन तोंड ..
.
मी कुठंतरी कमी पडलो हा भाव माझ्या मनामध्ये अजिबात नाही की कसलीच खंत नाही . काही पश्चाताप करण्याची नंतर वेळच येऊ नये म्हणून मी सर्वस्व पणाला लावूनच अभ्यासाला लागलो होतो.
पण होत अस काही वेळा – सर्वकाही करून सुद्धा पदरात निराशा पडते
( यश अपयश हा शब्द इथे लागू होत नाही .)
अस यासाठी म्हनालो की राज्यसेवा परीक्षा देणारा परीक्षार्थी
एकतर जिंकतो किंवा शिकतो तो कधीच हारत नाही .. मी जिंकलो नाही पण मी यामध्ये भरपूर शिकलो.. माझी निर्णय क्षमता वाढली माझी जगण्याची शैली बदलली. आता इथून पुढे मी ज्या क्षेत्रामध्ये काम करेल नकीच तिथे मला या क्षेत्रातील काही गोष्टींची मदत होईल .
शिस्त संयम आणि निर्णय क्षमता या गोष्टी घेऊन मी या रिंगणातून बाहेर पडलो आता मी पुढचा जो निर्णय घेईल तो माझ्या पुढच्या भविष्याला कलाटणी देणारा असेल .. .
.
हे सर्व मी माझी हार पचवण्यासाठी किंवा स्वतःची समजूत काढण्यासाठी बोलत आहे असं वाटत असेल पण तसं खरच नाही.
मी आधीच सांगितलं ना राज्यसेवा परीक्षार्थी कधीच हारत नाही
एकतर तो जिंकतो किंवा शिकतो ..
आणि मी शिकलो .
.
मितवा